Ad will apear here
Next
हिमालयाची सावली


‘अरे बाळ्या, डॉक्टरांचा नुकताच वाढदिवस झाला ना?’ माझा लंडनमधील मित्र विचारत होता. ‘हो, वाढदिवस १६ नोव्हेंबर. आणि आत्ताच नऊ डिसेंबरला ‘तन्वीर पुरस्कार सोहळा’ झाला; पण डॉक्टर आले नव्हते. तसे अंथरुणालाच खिळले आहेत. वयोमानपरत्वे तब्येत ढासळत चालली आहे. आता लंडनहून परत गेल्यावर भेटायला गेलं पाहिजे!,’ इति मी. तेवढ्यात माझा फोन वाजला. ‘बाळ्या, बातमी खरी आहे का? डॉक्टर गेले!’ फोनवर सुनीती जैन भारतातून बोलत होती. माझ्या पायाखालची जमीनच खचली. काही योगायोग केवळ अनाकलनीय असतात हेच खरं!

स्वच्छ गोरा रंग, भेदक, पण अथांग नितळ घारे डोळे, सुस्पष्ट वाणी आणि कमावलेला आवाज. उंची फार नसली तरी, खूप जुना स्नेह असूनही डॉक्टरांच्या सान्निध्यात हिमालयाच्या सावलीत असल्यासारखं भासत असे. केवळ मराठीच नाही, तर इतर भाषांतही नाट्यचित्र सृष्टीत अभिनयाचा हिमालय उभा करणारे डॉक्टर आता नाहीत यावर विश्वास बसत नाही! भेट हुकल्याचा सल आता कायमची सोबत करेल. शांतपणे थकत, निवत चाललेली एक ज्योत आज शांत झाली. एका युगाचा अस्त झाला, श्रद्धांजली! त्यांच्या भेटीबद्दल दोन वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख...
............
खाली धोतर, वर जुन्या पद्धतीचा सदरा, थरथरते हातपाय, कमरेत काहीसे वाकलेले, पंचाहत्तरीच्या आसपास वय, अंगाला दुरूनही जाणवणारा अस्पष्ट कंप. प्रथितयश वृद्ध लेखक राजाध्यक्ष एक छोटी पायरी चढून, स्टेजच्या मधे असलेल्या वर्तुळाकार लेव्हलवर चढतात. दोन्ही हात छातीशी घट्ट लपेटून घेत तो माणूस आता ताठ उभा राहतो. शरीरातील सारा कंप गायब! हे असतात चाळिशीचे राजाध्यक्ष. कपड्यात बदल नाही, मेकपमधे बदल नाही, केवळ ‘बेअरिंग’मधे बदल करून क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर अविश्वसनीय स्थित्यंतर घडलं होतं. १९८८ साल असावं. जुहूच्या पृथ्वी थिएटरमधे महेश एलकुंचवारांच्या ‘आत्मकथा’चा प्रयोग सुरू होता. स्टेजच्या मध्यावर, स्पॉटमधे डॉक्टर लागू ‘राजाध्यक्षां’च्या भूमिकेत उभे होते आणि माझ्या अंगावर काटा आला होता!

एका अर्थानं मी खूप नशीबवान आहे. आयआयटीत असताना दीपाशी ओळख झाली आणि लवकरच डॉक्टरांशी. केवळ अपघाताने मी नुकताच नाटकात लुडबुड करू लागलो होतो. येणं-जाणं वाढलं. डॉक्टरांच्या अभिनयाचा मी फॅन आहे. ‘नटसम्राट’, ‘हिमालयाची सावली’, ‘सिंहासन’ अशा साऱ्याचा एक दबदबा होता. सुरुवातीला माझ्या मनावर खूप दडपण असूनही, कुठलाही आव न आणता, समोर असलेल्या माणसाच्या पातळीला येऊन सहजपणे वागण्याच्या डॉक्टरांच्या स्वभावामुळे, वयात आणि कर्तृत्वात खूप अंतर असूनही छान मैत्री झाली. पूर्वी मुंबईला त्यांच्या ‘गोल्डमिस्ट’मधील निवासस्थानी मी अनेक नामवंतांना भेटलो आहे. त्यांची मतं ठाम असली, तरी ती ते दुसऱ्यावर लादत नाहीत. त्यांच्या वागण्यातील अकृत्रिमपणामुळे मला त्यांच्या जवळ जाता आलं हे माझं भाग्य!

डॉक्टर अतिशय शिस्तप्रिय. हे त्यांच्या वागण्यात सहजपणे दिसून येत असे. संगीताच्या पार्श्वभूमीवर त्यांचा चालणारा रियाज मी पाहिलेला आहे. अर्थातच दुरून. मोजकंच खाणं, या वयातही नित्यनियमानं फिरायला जाणं माझ्या ओळखीचं आहे. स्वच्छ गोरा रंग, उंची बेताची आणि ते तेजस्वी डेंजर घारे डोळे. ते कितीही प्रेमळ असले, तरी या माणसाच्या व्यक्तिमत्त्वातच असं काहीतरी आहे की आपण त्यांच्या जवळ जाताच एक दरारा जाणवतो. त्यांची बुद्धिमत्ता असेल, परखड विचार असतील किंवा त्यांच्या कर्तृत्वाचं अदृश्य वलय असेल, पण आपल्या मनात एक आदरभाव सहज उद्भवतो. मला ८७ साल लख्ख आठवतं आहे. मी नेतृत्व करत असलेल्या हिमालयातील ट्रेकवर अपघात झाला होता. त्याच ट्रेकवर डॉक्टरांचा मुलगा तन्वीरही होता. वर्तमानपत्रात उलट-सुलट लिहून येत होतं. त्याच्या पुढल्याच वर्षीच्या ‘कांचनजंगा’ मोहिमेचा मी नेता होतो. एकीकडे अपघाताचं दुःख, सल होता तर दुसरीकडे नवीन मोहिमेबद्दल धास्ती होती. डॉक्टरांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधे, पालक असूनही कुठलीही भीड न बाळगता एक पत्र लिहिलं होतं. त्यामुळे अनाठायी टीका शमली. या बाबतीत मी नेहमीच डॉक्टरांचा ऋणी राहीन.

डॉक्टर एक अत्यंत ताकदवान, उच्च दर्जाचे अभिनेते, कलाकार आहेत हे निर्विवाद सत्य आहे. त्यांच्या अभिनयात सखोल विचार, तयारी आणि त्यांची मेहनत दिसून येते. मी त्यांच्या अभिनयाच्या बाबतीतील अनेक ‘ष्टोऱ्या’ ऐकलेल्या आहेत. कुठल्याशा सीरियलची गोष्ट. एक शॉट चालू होता. डायलॉग असे नव्हतेच. सहअभिनेत्री आणि ते चालताहेत, ती काही तरी म्हणते. डॉक्टर मागे वळून पाहत, ‘हं!’ असं म्हणतात. डॉक्टरांच्या ‘हं!’मधे, ‘इतकं सारं होतं, तर तेव्हा का नाही बोललीस?’ असं त्यांच्या चेहऱ्यावर अभिप्रेत होतं. सहअभिनेत्री काहीतरी गडबड करत होती. चार/पाचवेळा रिटेक झाले. डॉक्टरांनी न कुरकुरता रीटेक दिले. शेवटी एकदाचा शॉट OK झाला. नंतर कधी तरी ते ‘शॉट्स’ पाहत असताना, दिग्दर्शकाच्या लक्षात आलं, की त्या पाचही ‘शॉट्स’मधे डॉक्टरांचा अभिनय कॉपी-पेस्ट वाटावा इतका तंतोतंत होता. ही अभिनयातील शिस्त थक्क करणारी आहे. मी त्यांच्या नाटकातील सहकलाकारांकडून त्यांच्या शिस्तप्रियतेबद्दल अनेकदा ऐकलेलं आहे. नाट्यसंहितेत कुठलाही फेरफार न करण्याबद्दल साऱ्यांनाच डॉक्टरांचा एक प्रेमळ धाक वाटत असे.

‘उद्ध्वस्त धर्मशाळा’तील एक दृश्य

डॉक्टरांची ‘तात्यासाहेबां’शी (वि. वा. शिरवाडकर) विशेष मैत्री होती. माझ्या पहिल्या नोकरीनिमित्त मी दिल्लीत वर्षभर राहिलो होतो. त्यामुळे दिल्ली माझ्या परिचयाची होती. महाराष्ट्र इन्फर्मेशन सेंटरमधे माझी मैत्रीण सुनीती जैन तेव्हा काम करत असे. संगीत नाटक अकादमीचा महोत्सव होता. तात्या आणि त्यांचा मित्रपरिवार, डॉक्टर, रामदास भटकळ अशा खाश्यांची सरबराई करायची जबाबदारी सुनीतीनं माझ्यावर टाकली होती. ह्या साऱ्यांचा सहवास ही माझ्यासाठी पर्वणी होती. तेव्हाच डॉक्टरांचं ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ पाहण्याचा योग आला. त्या नाटकात डॉक्टर सुमारे पाउण तास एकाच खुर्चीत बसलेले असतात. साहजिकच हालचालींवर मर्यादा, पण तशाही स्थितीतील डॉक्टरांचा अभिनय लाजवाब होता. कुठल्याशा हिंदी सिनेमात समुद्रकिनारी डॉक्टर मरून पडतात. लाटा अंगाशी खेळत असलेल्या कलेवराचा सीन, म्हणे ‘मरण्या’च्या अभिनयातील एक अप्रतिम ‘धडा’ समजला जातो.

गरुडमाचीला भेटकालच डॉक्टरांचा नव्वदाव्वा वाढदिवस होता. मी ‘अंबर’ हॉलमधे अभीष्टचिंतन करण्यासाठी गेलो होतो. जवळ जाऊन वाकून नमस्कार केला. डॉक्टरांनी मोठ्या प्रेमानं माझा हात हातात घेऊन कोचावर बसवून घेतलं. नमस्कारावरून आठवलं, डॉक्टरांना नमस्कार केलेला रुचत नसे. कुणी वाकून नमस्कार केल्यास, ते पटकन त्या माणसाला वाकून नमस्कार करत म्हणत असत, ‘अरे, माणसाला नमस्कार करू नये!’ ह्या अतिशय मोठ्या माणसाचा विनम्रपणा खटकत असे; पण नंतर लक्षात आलं की त्यात कुठलीही दांभिकता नव्हती. काल ते काही म्हणाले नाहीत. बहुधा वयोमानपरत्वे ते थोडे मवाळ होऊन अशा गोष्टी खपवून घेत असावेत. त्यांच्या मृदू स्पर्शातील प्रेम जाणवत होतं. अशा माणसाचा सहवास, मैत्री लाभली याबद्दल मी माझ्याच भाग्याचा हेवा करतो. त्यांच्याजवळ बसलेलो असतांना, आपण उत्तुंग कर्तृत्व असलेल्या नटसम्राटाच्या, हिमालयाच्या सन्निध असल्याचं जाणवत होतं; पण सोबत मायेची सावली होती. 

- वसंत वसंत लिमये
डॉ. श्रीराम लागूंसह वसंत वसंत लिमये

(डॉ. श्रीराम लागू यांची बाइट्स ऑफ इंडियाच्या संग्रहातील मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZMJCH
Similar Posts
माझा अभिनय आत्मप्रेरणेतून निर्माण होणारा : डॉ. श्रीराम लागू अर्धशतकाहून अधिक काळ आपल्या दमदार अभिनयानं रंगभूमी गाजवलेले ‘नटसम्राट’ डॉक्टर श्रीराम लागू यांचं आज (१७ डिसेंबर २०१९) पुण्यात निधन झालं. १६ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांना ९२ वर्षे पूर्ण झाली होती. दोन वर्षांपूर्वी म्हणजे त्यांना ९० वर्षं पूर्ण झाली, त्या वेळी ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे विवेक सबनीस यांनी डॉक्टर लागू यांची मुलाखत घेतली होती
हाडाच्या कार्यकर्त्या, संवेदनशील लेखिका – दीपा देशमुख प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचा २८ ऑक्टोबर हा जन्मदिन. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या औचित्याने दीपाताईंची जिवाभावाची मैत्रीण डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ यांनी लिहिलेला, दीपाताईंची वाटचाल उलगडणारा लेख त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. कार्यक्रमाचा व्हिडिओही शेवटी दिला आहे
अभिनयाचं विद्यापीठ प्रख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा स्मृतिदिन १७ डिसेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेला हा लेख...
‘हे रे काय, अरुण डियर?’ सह्याद्रीच्या आडवाटांतून दुर्गम गिरिशिखरांवर मनस्वीपणे विहार करणारे नामवंत गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरील साहसी मोहिमेत १८ जानेवारी २०२० रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. गेली अनेक वर्षे गिर्यारोहणासारख्या साहसी खेळांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेले ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना दिलेला हा उजाळा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language